पुणे, दि.१८मे २०२०: गेल्या वर्षी पुण्यात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात २५ सप्टेंबर २०१९ रोजी दांडेकर पूलाजवळील अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे त्या लोकांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यानंतर शासनाकडून त्यांचे पंचनामे करण्यात आले. सरकारने त्यावेळी पूरग्रस्तांना पंधरा हजारांची मदतही जाहीर केली होती. मात्र अद्यापही मदत अनेक नागरिकांपर्यंत पोहचलीच नसल्याचे समोर आले आहे.
यासाठी आंबील ओढा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या मुक्ताताई माने यांनी या अनेकदा तहसील कार्यालयामध्ये या मदतीसाठी हेलपाटे मारले आहेत. मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याचे त्यांनी “न्युज अनकट” शी बोलताना सांगितले.
याबाबत या परिसरातील स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे मागण्या केल्या आहेत.
◆ एका कुटुंबामध्येच या व्यक्तीचे चेक गेल्याचे लक्षात आले आहे. कित्येक लोक पुराच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये , घरचे नुकसान झालेलं असल्याने शाळांमध्ये, नातेवाईकांकडे राहिले होते. त्यामुळे त्यांच्या घरांचे पंचनामे राहून गेले आहेत. शासकीय अधिकारी खुर्ची टाकून पंचनामा करत होते. दारोदारी जाऊन लोकांचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे परत एकदा पंचनामे केले जावेत.
◆ ज्या लोकांना चार चेक एकाच कुटुंबात मिळालेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, पण जे लोक मदतीपासून वंचित आहेत, त्यांना मदत करा.
◆ स्थानिक पातळीवरील लोकांना मदतीला घेऊन पंचनामे करावे.
◆वारंवार सगळे आवश्यक कागदपत्रे पोहचवली असताना देखील अधिकारी आमच्याकडे कागदपत्रे नाहीत अशी तक्रार करतात. कागदपत्रे जमा करून घ्या.
आज लॉकडॉऊनच्या परिस्थितीमध्ये ह्या गरीब लोकांना पैशाची मदत मिळाली तर ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकतील. आम्ही सतत या कामाचा आढावा घेत आहोत. सर्व कागदपत्रे तहसीलदारांना उपलब्ध करून दिली असली तरी ती गहाळ झाल्याची उत्तरे कार्यालयात मिळतात. ज्या लोकांनी जास्तीचे चेक घेतले आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय उर्वरीत लोकांना मदत मिळणार नाही असे अधिकारी लोकांचे म्हणणे आहे. अशी मुक्ताताई माने यांनी सांगितले.
याबाबत तहसीलदार दिप्ती कुलथे म्हणाल्या की, मुळातच तिथले लोक उर्मट आहेत. त्या परिसरात प्रचंड राजकारण चालते. पाण्याचा कडेने सर्व लोकांची घरे आहेत. जे की कायद्याच्या विरोध आहे. परत यावर्षी पूर आला तर त्या लोकांना कोणतेही मदत उपलब्ध होणार नाही. परत पंचनामे करणे शक्य नाही. ज्या कुटुंबातील लोकांनी जास्तीचे चेक घेतले, त्यातील पाच ते सहा कुटुंबातील लोकांनी ते आम्हला परत दिले आहेत. जे उर्वरित लोक आहेत त्यांचे अकाऊंट डिटेल्स आमच्याकडे आलेले नाहीत. त्या लोकांना यावंर्षी पाऊस येण्याआधी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे अथवा तिथे अतिक्रमण करण्यात यावे नाहीतर एस.आ.रे अंतर्गत घोषित करून स्थलांतर कारावे,अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे