बारामती, 6 नोव्हेंबर 2021: राज्यात कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्याची माहिती समोर आलीय. त्याचवेळी त्यांच्या दोन चालकांसह चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खुद्द शरद पवार यांनी ही माहिती दिलीय.
काल बारामतीत कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांना कोरोनाची लक्षणं दिसली आहेत, त्यामुळं आज सकाळी त्यांची तपासणी करण्यात आलीय. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्याचवेळी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कर्मचारी आणि दोन चालकांना कोरोनाची लागण झालीय.
बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1193 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान राज्यात 39 जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 18691 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1,40,345 जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय. त्याचवेळी 64,56,263 जणांनी कोरोनावर मात केलीय.
देशाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात कोरोनाचे 12,729 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 221 लोकांचा मृत्यू झाला असून 12,165 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,48,922 सक्रिय रुग्ण आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे