गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा

बारामती, १७ ऑक्टोबर २०२० : बारामती शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या पुरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुरग्रस्त भागात जाऊन पाहाणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला, पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पहाणी करण्यास सुरुवात केली.भिगवण रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पहाणी केली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.  शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version