उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश!

Ajit Pawar Honors Students Scoring Above 90%
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव;

Ajit Pawar Honors Students Scoring Above 90%: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधून दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. महापालिकेच्या वतीने या प्रत्येक विद्यार्थ्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ (Direct Benefit Transfer) अंतर्गत साहित्याचे वाटपही करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रकल्पांचा समावेश करून शिक्षण अधिक अद्ययावत आणि गुणवत्तापूर्ण करावे.” त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात शिक्षण विभागाची सक्षम हस्तपुस्तिका, इंग्रजी हस्तपुस्तिका, डिजिटल लर्निंग बालवाडी दिनदर्शिका, प्राथमिक दिनदर्शिका आणि पालक दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या कलावस्तू देऊन उपमुख्यमंत्री पवार यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रदीप जांभळे-पाटील, किरणकुमार मोरे, मकरंद निकम, बापूसाहेब गायकवाड आणि संगीता बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सन्मान;

  • स्वप्नाली झिंजे – निगडी शाळा (९६.००%)
  • महतो धीरेंद्रकुमार गजेंद्र – खराळवाडी शाळा (९०.८०%)
  • गायत्री बीजमवर – काळभोरनगर शाळा (९४.४०%)
  • ईशा पाटील – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९७.६०%)
  • श्रावणी टोणगे – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९३.००%)

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे