देशातील पाणी साठ्याचा आढावा, या १६ राज्यांमध्ये पूर येण्याची शक्यता

पुणे, दि. १३ जून २०२०: गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला पडला होता त्यामुळे पाण्याचा साठा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला होता. असे असतानाच आता मान्सून देखील सुरू झाला आहे. हवामान विभागाने असे सांगितले आहे की यावर्षी पाऊस सामान्य स्वरूपाचा पडेल. अशा परिस्थितीत एक चिंतेची गोष्ट म्हणजे अगोदरच धरणांमध्ये विपुल प्रमाणात पाणी आहे. त्यात जर पाऊस पडला तर अतिरिक्त साठा धरणांमध्ये झाल्यास पूर येण्याची संभावना आहे. तसेच हे पाणी जरी धरणातून सोडले तरी पुढील भागामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्व राज्यांमधील धरणांच्या परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) ११ जूनच्या बुलेटिननुसार, देशातील १२३ जलाशय (धरणे) गेल्या वर्षीच्या तुलनेत १७३ टक्के अधिक भरली आहेत. या १२३ जलाशयांमध्ये सध्या ५४.६३६ अब्ज घनमीटर (बिलियन क्यूबिक मीटर) पाणीसाठा आहे. तर मागील वर्षी याच काळात या जलाशयांमध्ये किंवा धरणांमध्ये ३१.५७२ अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला होता.

यावेळी मान्सूनचा पाऊस जास्त झाला तर धरणांमध्ये अधिक पाणी साचेल. यानंतर विविध राज्य सरकारे व प्रशासनाला सक्तीच्या अंतर्गत धरणांच्या मो-या उघडाव्या लागतील. ज्यामुळे धरणाच्या सभोवतालच्या खालच्या भागात पूर येण्याची शक्यता आहे.

वरील १२३ धरणे पाहता त्यांतील पाणीसाठा नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावर्षी देखील जर पावसाचे प्रमाण जास्त राहिले तर धरण क्षेत्रांमध्ये पुर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार किंवा राज्य सरकार संभाव्य होणाऱ्या परिस्थितीसाठी तयार आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. जर या वेळेस पाऊस जास्त राहिला तर सहाजिकच या सर्व धरणांमधून आणि जलाशयांमधून पाण्याचा निचरा करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे सभोवतालच्या भागांमध्ये तेथील प्रशासनाने याबाबत काही पूर्वतयारी केली आहे का हे देखील महत्त्वाचे आहे.

दरवर्षी उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यासह अनेक राज्ये पुरामुळे त्रस्त असतात. यावर्षी नेहमीपेक्षा धरणांमध्ये पाणी साठा जास्त आहे अशा परिस्थितीत आपण असा विचार करू शकतो का की, आत्तापासूनच धरणांमधील थोडेथोडे पाणी सोडण्यास सुरुवात करावी. जेणेकरून मान्सून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास हे धरणे हळूहळू भरतील व संभाव्य पूरजन्य स्थिती टाळता येईल.

मागील वर्षी कर्नाटक-महाराष्ट्र आणि त्याच बरोबर २०१८ मध्ये केरळमधील आलेला पूर, ही धरणांमुळे आलेल्या पुराची ताजी उदाहरणे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या भागांमध्ये जोरदार मान्सून तसेच धरणाची क्षमता पूर्ण झाल्यामुळे सोडण्यात आलेले पाणी या सर्वांचा परिणाम भयंकर पुराच्या स्वरूपात दिसून आला होता. महाराष्ट्रात मागील वर्षीच्या मान्सूनमुळे व धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली होती.

११ जून २०२० रोजी देशाच्या उत्तर भागातील धरणे व जलाशयांमध्ये सरासरी साठा ३९ टक्के आहे, जो मागील वर्षी याच काळात २९ टक्के होता. देशातील उत्तर भागामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश आहे. यापैकी ८ जलाशय सीडब्ल्यूसी अंतर्गत आहेत. त्याचबरोबर देशातील पूर्व भागातील जलाशय आणि धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हाच साठा मागच्या वर्षी १९ टक्के होता. या प्रदेशात झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि नागालँडचा समावेश आहे. या राज्यांचे १८ जलाशय सीडब्ल्यूसी अंतर्गत येतात.

देशाच्या पश्चिम भागांमधील धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर, मागील वर्षी याच काळामध्ये हा पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत होता. गुजरात व महाराष्ट्रातील पश्चिम भागातील ४२ जलाशय सीडब्ल्यूसी अंतर्गत येतात. देशाच्या मध्यभागातील धरणांमध्ये ३८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, मागील वर्षी यावेळी २४ टक्के होता. देशाच्या मध्यभागी क्षेत्रांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या प्रदेशात समावेश होतो. या राज्यांचे १९ जलाशय सीडब्ल्यूसी अंतर्गत येतात. देशाच्या दक्षिण भागांमधील धरणांमध्ये २४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर हा साठा मागच्या वर्षी याच वेळी १२ टक्के होता. देशाच्या दक्षिण भागांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येतात. या राज्यातील ३६ जलाशय सीडब्ल्यूसी अंतर्गत येतात.

गतवर्षीच्या तुलनेत गंगा, सिंधू, नर्मदा, तापी, माही, साबरमती, कच्छ नद्या, गोदावरी, कृष्णा, महानदी, कावेरी येथे सामान्य पाण्याची पातळी असल्याचे सीडब्ल्यूसीने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. म्हणजेच या नद्यांमधील पाणी आटलेले नाही ते सामान्य स्तरावरच आहे त्यामुळे या नद्यांमध्ये देखील पूर येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत या १६ राज्यांच्या जलाशयांमध्ये पाण्याचा साठा चांगला आहे ही राज्ये आहेत पंजाब, राजस्थान, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू.

संपूर्ण देशात फक्त हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँड आहेत, जेथे जलाशयांमध्ये मागील वर्षापेक्षा कमी पाणी आहे. परंतु मान्सूनचा पाऊस चांगला झाला तर तेही त्यांच्या क्षमतेने पूर्ण भरतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा