देशातील रुग्णालयांकडून सोलापुरी टॉवेल,चादरी अन् बेडशीटला मागणी

सोलापूर, दि.२२ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरी टेक्स्टाईल इंडस्ट्री सध्या ठप्प आहे. लॉकडाऊनच्या २ महिन्यानंतर देशभरातील रुग्णालयाकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मोठी मागणी येत आहे.

सोलापुरातील टेक्स्टाईल कारखाने बंद असल्याने मागणीनुसार पुरवठा होईना. काही कारखानदारांनी मनपाची परवानगी घेऊन ‘स्टे इन’ च्या धर्तीवर उत्पादन सुरू केले.
पण यंत्रमाग कामगार कारखान्यात थांबायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा सुरू झालेले कारखाने बंद झालेत. ‘स्टे इन’ ची अट रद्द करा, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे.

सोलापुरातील टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद असल्याने जवळपास ५०,००० कामगार घरीच बसून आहेत. एक हजारांहून अधिक कारखाने बंद आहेत. औद्योगिक वसाहती सुरु करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनी मनपा प्रशासनाकडे कारखाने सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. बहुतांश टेक्स्टाईल कारखानदारांनी आनलाईन अर्ज देखील दाखल केले. प्रशासनाकडून ‘स्टे इन’ ची अट घालण्यात आली आहे.

कारखान्यात काम करणारे कामगार कारखान्यात रहावेत. ते घरी जाऊ नयेत, अशी अट प्रशासनाने घातली आहे. काही कारखानदारांनी कामगारांना कारखान्यात ठेवून घेण्याची तयारी दर्शवली, पण यास कामगारांनी नकार दिला आहे. कारखान्यात थांबण्याची कामगारांची मानसिकता नाही, त्यामुळे कामगारांना ये-जा करण्याकरिता पासेस द्यावेत, अशी मागणी देखील टेक्स्टाईल कारखानदारांकडून झाली आहे.

यास मनपा प्रशासन तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाने साफ नकार दिला आहे. टेक्स्टाईल कारखाने सुरू करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: