मध्य प्रदेश : जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील सभेत त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल करत संबंधित विधान केले आहे.
यावेळी शाह म्हणाले, की जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वाचवायचा प्रयत्न करत आहेत.
भारतावर जितका माझा तितकाच तुमचाही अधिकार आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे. कितीही विरोध झाला तरी आम्ही सर्वांना नागरिकत्व देणार आहोत.
आज काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी या कायद्यात नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद तरी आहे का, हे शोधून दाखवावं. हा कायदा नागरिकत्व हिरावून घेणारा नसून नागरिकत्व देणारा आहे, व्होटबँकेसाठी सर्व विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.