जालना, ३१ जानेवारी २०२४ : जालना शहरातील पाणी पुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडला असून अनेक भागात तब्बल १५ ते २० दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. त्यातही जेमतेम अर्धा तास पाणी सोडले जात असून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील जनतेतून तक्रारींचा ओघ वाढला आहे. शिवाय कचऱ्याची गाडी देखील आठवड्यातून एक दिवस येत असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवरील पथदिव्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद आणि दिवसा सुरू असल्याचा हास्यास्पद प्रकार सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी आज जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन निवेदन देत उपरोक्त समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
जालना नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर होऊन दर्जा बदलला असला तरी कारभारात मात्र कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट जबाबदारीचे भान नसल्याने महापालिकेचा कारभार ढेपाळला असल्याचा आरोप युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी केला आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करावा या आणि अन्य मागण्यांसाठी आज सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत जालना शहर महानगर पालिकेसमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतरही महानगर पालिकेच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी