डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

मुंबई, ८ जुलै २०२० : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (७ जुलै) रोजी दोघा अज्ञातांनी नासधूस केली. याप्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी तमाम अांबेडकरी जनतेला शांततेचं आवाहन केलं असून गृहमंत्र्यांनी सुध्दा दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं.

याशिवाय अज्ञातांनी डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेची देखील नासधूस केली आहे. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झालं आहे. माटुंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचं हे निवासस्थान आहे. पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधलं होतं. बाबासाहेबांचे जगभरातील अनेक अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

राजगृहाच्या आजूबाजूला जमू नका, शांतता राखा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केलं . दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे की, दादर येथील ‘राजगृह’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.

या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा