सध्याचे हवामान आणि राजकारण दोघांचे तंत्र बिघडलेले आहे. ऋतू नावाची संज्ञा गायब होत चालली आहे. कधी प्रचंड उकाडा, तर कधी तुफान पाऊस तर कधी कडाक्याची थंडी. वाटेल तसे हवानान पालटाला सध्या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे.सध्या विदर्भासह पुण्यात गर्मीचे प्रमाण वाढत आहे. त्यातही खास करुन विदर्भ , चंद्रपूर येथे पारा ४२ ते ४५ अंशाच्या आसपास फिरत आहे. तर दुसरीकडे असानी वादळामुळे ओडीशा, उत्तर आंध्र प्रदेशात पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे अति पाऊस आणि अति उष्मा हे हवामानाचं बिघडलेलं तंत्र.
आता वळूया राजकारणाकडे.मनेसेने आधी भोंग्यांवरुन राजकारण केलं. त्यानंतर नवनीत राणा यांचे हनुमान चालीसा नाट्य गाजलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तोफ १४ मेला काय डागणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. संजय राऊत विरोधकांवर आरोप करण्यात मग्न आहे. विरोधक मविआ चे गुन्हे शोधण्यात मग्न आहे. केंद्र सरकार सध्या फक्त नवनवीन योजनांचे उद्घाटन करण्यात गुंतलेला आहे.
पण मग सर्व सामांन्यांकडे कोण पाहणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महागाईने जनता होरपळून निघत आहे. घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला. तेलाचे दर वाढले. दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेल , सीएनजी गगनाला भिडत आहे. कुटूंबाचे मासिक बजेट कोलमडले आहे.
पण राजकारणी याकडे कानाडोळा करत आहे. केवळ मतांसाठी सगळे पक्ष काम करतात आणि जिंकल्यानंतर जनतेला विसरुन जातात. हेच सत्य आजपर्यंत दिसून आलं आहे.
त्यामुळे हवामानाबरोबर राजकारण्याचे बिघडलेले तंत्र सर्वसामांन्यांना पुन्हा वेठीस धरत आहे. तेव्हा जनतेचा खरा वाली कोण? हा प्रश्न तसाच कायम आहे. आणि याचे खरे उत्तर कधी मिळेल , हे जनतेलाही माहित नाही आणि कदाचित राजकारण्यांना तर नाहीच नाही… खरे चित्र लवकरच पहायला मिळेल अशी आशा करुयात …
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस