पिंपरी-चिंचवडचा भविष्यवेधी विकास आराखडा जाहीर १८ मीटरचे रस्ते, दोन पालखी तळ आणि बरंच काही..

Development of Pimpri-Chinchwad city
विकास आराखडा जाहीर १८ मीटरचे रस्ते, दोन पालखी तळ

Development of Pimpri-Chinchwad city:पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा सुधारित प्रारूप विकास आराखडा अखेर प्रशासक शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे. या भविष्यवेधी आराखड्यात शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधांना सर्वाधिक महत्त्व देण्यात आले असून, तब्बल २८ गावांसाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

देहू-पंढरपूर पालखी मार्गावर दोन ठिकाणी भव्य पालखी तळांचे आरक्षण

आराखड्यातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे शहरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी आता किमान १८ मीटर असणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, देहू-पंढरपूर पालखी मार्गावर दोन ठिकाणी भव्य पालखी तळांचे आरक्षण करण्यात आले आहे, ज्यामुळे वारकऱ्यांची सोय होणार आहे.

शहराच्या आधुनिक गरजा लक्षात घेता, मल्टिमोडल हब, ट्रक टर्मिनस आणि कन्व्हेन्शनल सेंटरसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीनुसार चार्जिंग स्टेशन्स आणि मेट्रो स्टेशन परिसरात वाहनतळांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच, क्रीडाप्रेमींसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि प्रशासकीय व व्यावसायिक गरजांसाठी सुपर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कम कमर्शिअल कॉम्प्लेक्सची योजना आहे.

या आराखड्यात केवळ पायाभूत सुविधांवरच नव्हे, तर सामाजिक गरजांवरही लक्ष केंद्रित केले आहे. गरीब व मध्यमवर्गीयांसाठी घरे, ‘म्हाडा’साठी आरक्षण, सार्वजनिक बागबगिचे, खेळाची मैदाने, रुग्णालये, टाऊन हॉल, भाजीमंडई, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयांचा समावेश आहे. पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठीही योग्य जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

नदीकिनारी असलेल्या हरित पट्ट्याच्या संकल्पनेत बदल करत, आता रिव्हर फ्रंट रिक्रिएशनल साइट विकसित केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात विरंगुळा घेता येईल आणि महापालिकेला या जागा विकसित करता येतील.

हा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी उपग्रह प्रतिमा, ड्रोन आणि जीआयएस प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीचे अचूक सर्वेक्षण करून नियोजन करणे शक्य झाले आहे.

आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहर हितासाठी आपल्या सूचना व हरकती ६० दिवसांच्या आत सादर कराव्यात. चांगल्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल आणि त्याआधारे आवश्यक बदल करण्याची शिफारस नियोजन प्राधिकरणाकडे केली जाईल.

२०२१ पर्यंतची लोकसंख्या आणि भविष्यातील २०४१ पर्यंतची अंदाजित ६१ लाख लोकसंख्या विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहराच्या विकासाची दिशा निश्चित होणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा विकास आराखडा अधिक उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे