वाई, १२ ऑगस्ट २०२२: जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक योजनेनुसार जुन्या पालकमंत्र्यांनी मंजुरी दिलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आलीय. सातारा जिल्ह्यात ४०० कोटीची कामं ठप्प आहेत. पालकमंत्री नसल्यामुळं ही कामं होऊच शकत नाही.
भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्याचा पहिला दणका जिल्हा नियोजन मंडळाला बसलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरदेखील जिल्ह्याचा कारभार पालकमंत्र्यांशिवाय सुरु आहे. जी कामं सुरु आहेत, त्या कामांना स्थगिती दिली जाणार नाही.
याचबरोबरच जिल्हा नियोजन मंडळातील पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या सदस्यांना निरोप दिला जाईल. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त सदस्य निवडले होते. जोपर्यंत हे नवीन सरकार पालकमंत्री देत नाहीत, तो पर्यंत उरलेली कामे पुन्हा सुरु होऊ शकत नाही.
पावसाळी परिस्थितीमुळं नुकसान झालेल्या भागात तातडीने आधार देण्यासाठी समितीमधून तात्पुरती मदत केली जाते. पण ती मदतही सध्या ठप्प आहे. प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा हीच अपेक्षा केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर