देवेन भारती यांनी स्विकारला मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार!

मुंबई, ५ जानेवारी २०२३ : मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार गुरुवारी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी स्विकारला आहे. राज्य सरकारने बुधवारीच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्त केली होती. त्यानंतर आज आयपीएस देवेन भारती आज पदभार स्वीकारण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी कायदा व सुवव्यस्था विभागाचे जॉईंट सिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.

  • फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत भारती

राज्य शासनाच्या आदेशानुसार यापुढच्या काळात सर्व सहपोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्ट करतील. आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील. देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आले.

दरम्यान, मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

कोण आहेत देवेन भारती ?

५४ वर्षीय देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील असून, त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन ९ आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा आणि त्यानंतर सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर ते होते. ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा