मुंबई, १४ जुलै २०२२: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यात मंत्रीपदाचा वाटप नेमकं कसं होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्यामुळे अद्याप मंत्रीमंडळ विस्तार अधांतरीच आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात असताना भाजपने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ती शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ वर दाखल झाले.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं. या पत्रांमध्ये पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षांशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे.
ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी आहे. अशा शब्दांत फडणवीसांचं अभिनंदन केलं. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे
यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपच्या गोटातून सांगितलं जात आहे. मात्र सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पाश्वभूमीवर आणि मुबंई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणावर देखील चर्चा झाल्याची वार्ता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:अमोल बारवकर