मुंबई, दि. १७ जुला २०२० : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते काही केंद्रीय मंत्री आणि पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घालणार आहेत. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. या नेत्यांसह साखर प्रश्नाच्या मुद्यावर फडणवीस केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. असं असलं तरीही फडणवीस यांच्या या दौ-याच्या निमित्ताने काही इतर मुद्यांचीही चर्चा होते आहे.
राजस्थानात काँग्रेसचं सरकार अस्थिर आहे आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. अशा प्रकारचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही केला जात असतो. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी