मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तापलेले वातावरण अधिक चिघळलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज थेट विरोधकांवर हल्लाबोल करत स्पष्टपणे सांगितलं की, “विरोधकांना फक्त राजकारण करायचंय, पण आम्हीच ओबीसी आणि मराठा समाजाच्या खऱ्या हक्कांची लढाई लढतोय.” फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं की, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गेलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याचं काम त्यांच्या सरकारनेच केलं.
ते म्हणाले की, २०१४ ते २०२५ दरम्यान आमच्या सरकारनेच ओबीसी समाजासाठी सर्वाधिक निर्णय घेतले – स्वतंत्र मंत्रालय, वसतिगृहे, महाज्योती संस्था आणि योजनांचा पाऊस पाडला. “एकाही अपात्र व्यक्तीला ओबीसीत घुसवणार नाही, कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणं थांबवा,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
फडणवीस यांनी अजून एक स्फोटक विधान करत सांगितलं – “मराठा-ओबीसी समाजातील नेते खरी वास्तविकता समोर आणायला तयार नाहीत, कारण त्यांना तेढ कायम ठेवायची आहे. पण आम्हीच ही खरी वास्तविकता लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सामाजिक तेढ कमी करणार आहोत.”
शैक्षणिक क्षेत्रातल्या रिक्त पदांवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “राज्यातील विद्यापीठांमधील ८० टक्के प्राध्यापकांची पदं भरण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. लवकरच उर्वरित २० टक्के पदांनाही मान्यता दिली जाईल.”
एकूणच, फडणवीसांच्या या थेट आणि आक्रमक विधानांमुळे मराठा-ओबीसी वादाचं राजकारण आणखी पेटणार हे नक्की!
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































