ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रवींद्र टोंगे यांचे सुरू असलेले उपोषण संपले, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई

चंद्रपूर, ३० सप्टेंबर २०२३ : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले उपोषण रवींद्र टोंगे यांनी अखेर वीस दिवसानंतर सोडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण स्थळी येऊन टोंगे यांना ज्यूस दिला आणि त्यानंतर टोंगे यांनी उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल ओबीसी संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे यांनी गेल्या वीस दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्याबरोबर विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांनीही गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या तिघांनाही लिंबू पाणी देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे उपस्थित होते. यावेळी टोंगे यांनी आम्ही उपोषण आणि ओबीसींची सर्व आंदोलने मागे घेत असल्याचे जाहीर केले.

काल ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शिंदे यांनी ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळेच टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

दरम्यान, राज्य सरकार ओबीसींच्या पाठीशी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण दिले जाणार नाही. ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नाही. आम्ही सकारात्मक आहोत. ओबीसींना निधी देण्यात आम्ही कोणतीही काटकसर करणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

काल ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी अडीच तास चर्चा केली. त्यात त्यांचे प्रश्न निकाली लागले. अजून काही प्रश्न असतील तर आम्ही अजूनही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही ओबीसींचा एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. त्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. ओबीसींच्या हितासाठी जे लोक काम करतात त्यांच्यासोबत चर्चा करण्यास आम्ही कधीही तयार आहोत. ओबीसींच्या उत्कर्षासाठी राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेत आले आहे. यावेळीही घेणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत. पण म्हणून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आम्ही आरक्षण देणार आहोत. दोन समाज समोरासमोर येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच ओबीसींना जी जी आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा