मुंबईतील कालच्या आकड्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

नाशिक, दि. ८ जुलै २०२० : मुंबईमधील कोविड -१९ रुग्णांची संख्या जास्त आहे. सरकार त्याची निश्चित आकडेवारी लोकांसमोर आणत नाही त्यामुळे मुंबईतील लोकांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील हायरिस्क कॉन्टॅक्टची टेस्टिंगच होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक मध्ये आले होते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. मुंबईत हायरिस्क कॉन्टॅक्टची टेस्टिंग होत नाही. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा आहे. मुंबईत काल फक्त ३३०० टेस्ट केल्या म्हणून ८०६ बाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीसारख्या शहरात रोज २८ हजार चाचण्या केल्या जातात, पण मुंबईत फक्त ३३०० टेस्ट केल्या जात आहेत. मुंबईत रोज २५ हजार टेस्ट करायला हवी. फक्त नंबर कमी करण्यासाठी टेस्ट कमी केल्या जात आहेत. मुंबईत मास टेस्टिंग सुरू केली पाहिजे, असे सांगतानाच मुंबईत भीषण परिस्थिती असून मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.

“जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्यात, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल, तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात. केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला? याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी कोरोना विरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे,” असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा