सोलापूर, २५ ऑगस्ट २०२०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या सलग्न असलेल्या अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाने रद्द केल्या आहेत. मागील दोन महिन्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर परीक्षा शुल्क परत मिळावे किंवा पुढील सत्रात वर्ग करावे यासाठी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
अभाविपने या पूर्वी तीन निवेदने विद्यापीठास दिली आहेत. तसेच ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठ परिक्षेत्रात तीव्र आंदोलन केले, तरीही विद्यापीठाने कोणताहि निर्णय न घेता विद्यार्थ्यांची दिशा भूल केली आहे. विद्यापीठाने दिनांक १९ ऑगस्ट रोजी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, म्हणून अभाविपने आंदोलनास स्थगिती दिली होती.
अभाविप इथेच न थांबता सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्यांना परीक्षा शुल्क रद्द करण्याबाबत आपण विद्यापीठ प्रशासन, मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री यांना विद्यार्थी हिताचाच निर्णय घेण्यास सांगावे म्हणून निवेदन दिले होते. दिनांक १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रात सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय न झाल्याने आपण परीक्षा शुल्कचा निर्णय न घेतल्याचे विद्यापीठाने कळविले होते. परंतू परीक्षा शुल्क परत करण्याचा विषय अंतिम वर्ष सोडून इतर विद्यार्थ्यांचा आहे पण विद्यापीठाच्या या उत्तरामुळे विद्यापीठं विद्यार्थ्यांनच्या भावनांशी खेळत आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यापीठास विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल.आणि अभाविप विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय शांत बसणार नाही.
म्हणूनच, संतप्त छात्रशक्तीचा दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात धडक मोर्चा होणार असून, सोलापूर शहरासह अक्कलकोट, बार्शी, मोहाळ, पंढरपूर, माढा, माळशिरस, अकलूज आणि सांगोला या ठिकाणाहून मोठ्या संखेने छात्रशक्ती चालून येणार आहे. होणाऱ्या सर्व परिणामास विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल असे मा. जिल्हाधिकारी व मा.पोलिस आयुक्त यांना माहितीस्तव कळविले आहे. तसेच मोर्चा काढत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे अभाविप महानगर मंत्री सुरज पावसे यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. किंवा पुढील सत्रात वर्ग करावे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शैक्षणिक शुल्कात ३०% टक्के कपात करावी. शैक्षणिक शुल्क ४ टप्यामध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. विद्यार्थी ज्या सोई सुविधांचा वापर करत नाहीत त्यांचे शुल्क आकारण्यात येऊ नये. ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय लवकर घेण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्या या धडक मोर्चात असतील, अशी माहिती अभाविप महानगर मंत्री सुरज पावसे यांनी दिली.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड