सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२२: न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळित यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळित यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे सध्याचे मुख्य न्यायाधीश लळित यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहेत, म्हणून त्यांच्या नावाची शिफारस अधिवेशनानुसार करण्यात आली.

कोण आहेत धनंजय चंद्रचूड ?

न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आणि याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसेच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ‘न्यायशास्त्र’ या विषयात त्यांनी पीएचडीही केली. धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. तसेच धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड हे देशाचे सोळावे सरन्यायाधीश होते. त्यानंतर त्यांचा मुलगा धनंजय देखील आता सर्वोच्च न्यायसंस्थेचे उच्चपद सांभाळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा