मुंबई, १९ जानेवारी २०२३ :राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आज सोळा दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस धनंजय मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तीन जानेवारीच्या मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे अपघात घडला होता. यावेळी त्यांच्या छातीला जखमा झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर दिवसांच्या उपचार सुरु होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज घेऊन रुग्णालयातून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, पुढील काही दिवस मुंडे यांना सहकारी मित्र, कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.