मुंबई : मुंबई येथे दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) या कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिर्चीचे २०१३ मध्ये लंडन येथे निधन झाले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणी गोळा करण्याच्या गुन्ह्यांमधील उजवा हात अशी मिर्चीची ओळख होती. त्याने गुन्ह्यांच्या माध्यमातून मुंबईत काही मालमत्ता खरेदी केल्या. त्यातील तीन मालमत्ता वाधवान बंधूंच्या सनब्लिंक नावाच्या कंपनीला विकण्यात आल्या.
त्या अवैध व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता (मनी लॉण्डरिंग) झाल्याचा आरोप आहे. त्यावरून कपिल वाधवान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी कामी सहकार्य करत नसल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २९ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. संबंधित प्रकरणात वाधवान यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती.