मुंबई, १० जुलै २०२३ : एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून फुटून बाहेर गेल्यानंतर अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही. आमच्यावर अन्याय होत असल्यामुळे आम्ही शिवसेना सोडली, असे सर्वजण सांगत होते. एक वर्षानंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होऊन अजित पवार राष्ट्रवादीचा गट घेऊन सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासूनच शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज असल्याचे बोलले जाते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेतील सर्व मंत्री आणि आमदार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अजित दादांना अर्थमंत्रीपद देऊ नये यासाठी विनवणी केली होती.
महाविकास आघाडीचे २०१९ मधील सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद होते. त्यांच्याकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे अनेकदा आमदारांनी बोलून दाखवले होते. तर त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि शिंदे मुख्यमंत्री झाले तर शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत.
आता पुन्हा एकदा अजित पवारांकडे अर्थखाते गेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अजित पवारांकडेच राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत. त्यामुळे हा धक्का नेमका मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशी चर्चा आहे. कारण सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील अर्थखाते हे फडणवीस यांच्याकडे होते. तर शिंदे गटातील आमदाराचा विरोध असतानाही ते अजित पवार यांच्याकडे गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदक