९.६० लाखांचा ‘वृक्षदंड’ दिघीतील २० झाडे तोडणे पडले महागात!

18
Illegal tree cutting Dighi leads to ₹9.60 lakh fine
९.६० लाखांचा 'वृक्षदंड' दिघीतील २० झाडे तोडणे पडले महागात!

Illegal tree cutting Dighi leads to ₹9.60 lakh fine: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्यावर भर दिला जात असताना, पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिघी येथील स्वराज कॉलनीतील श्री काशीमठ संस्थानच्या जागेवरील तब्बल २० झाडे महापालिकेच्या परवानगीशिवाय मुळासकट काढल्याने संबंधित जागामालकाला ९ लाख ६० हजार रुपयांचा दणका बसला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने ही दंडात्मक कारवाई केली असून, पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यातून कठोर संदेश देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री काशीमठ संस्थानच्या मालकीच्या जागेवर नारळ, सुपारी, तुती, साग, आवळा, अंबाडी, बदाम आणि काजू यांसारख्या विविध प्रकारची चार ते पाच फूट उंचीची झाडे होती. ही झाडे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जागामालकाने काढून टाकल्याची तक्रार कृष्णा प्रभू यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती. तक्रारीची दखल घेत उद्यान सहायक आणि सहायक उद्यान अधीक्षक यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी जागेचा पंचनामा केला. पंचनाम्यात २० झाडे काढल्याचे स्पष्ट झाले.

महापालिकेने जागामालक मोहनदास मल्या यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, परंतु त्यांनी या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर, विनापरवानगी वृक्षतोड केल्याबद्दल प्रत्येक वृक्षासाठी ५० हजार रुपये आणि फांद्या छाटणीसाठी १० हजार रुपये असा, एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिकेचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यातून देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे