गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

25

मुंबई, २४ मे २०२३: राज्यातील ज्या मंदिर देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगर परिषदेस वितरित करावा. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान ५ कोंटीवरुन १० कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात ७३ कोटी ८० लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर