डिजिटल सातबारा मधून ३२ कोटींचा महसूल

पुणे: भूमी अभिलेख विभागाने राज्यातील १ कोटी ६७ लाख सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले आहे.  तसेच सातबारा उताऱ्यांसाठी नागरिकांना ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. या मोहिमेसाठी सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण केले आहे.
संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण योजनेतील डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा वितरणातून राज्य शासनाला दोन महिन्यात तब्बल ३२ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा २० सप्टेंबरपासून राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुला झाला आहे. राज्यात दोन कोटी ५२ लाख सातबारा असून त्यापैकी आतापर्यंत एक कोटी ९० लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. ते राज्यातील जनतेला प्रतिमागे १५ रुपये शुल्क मोजून उपलब्ध  होणार आहेत. पुणे जिल्ह्यात ८६ टक्के सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.
राज्यात आतापर्यंत डाउनलोड केलेले सातबारा उतारे (जिल्हानिहाय संख्या)

अकोला (२५,२६६), औरंगाबाद (१९,१०१), जालना (१९,०६२), यवतमाळ (१८,३८४), उस्मानाबाद (१७,७३७), पुणे (१७,५०८), सोलापूर (११,९१९), बुलढाणा (१०,९७९), अमरावती (८,६१३), हिंगोली (८,४४१), नगर (७,०६७), नांदेड (५,६०२), वाशिम (५,२८०), जळगाव (५,१६५), नाशिक (४,८११), लातूर (४,८०६), परभणी (४,५२७), चंद्रपूर (४,०१०), बीड (३,४६८), सातारा (२,६९४), कोल्हापूर (२,४५४), ठाणे (१,४८७), रायगड (१,१३०), नंदुरबार (९५७), सांगली (८९२), नागपूर (८६३), पालघर (८५८), गोदिंया (८२३), धुळे (७६०), भंडारा (६४४), गडचिरोली (२९१), मुंबई उपनगर (१९७), रत्नागिरी (१०९), वर्धा (८४) आणि सिंधुदुर्ग (७).
राज्यात अनुक्रमे अकोला, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेतला आहे. तर पुणे जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा