पैशांसाठी माणुसकीला तिलांजली; दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा; गर्भवतीचा बळी, जुळ्या नवजात अर्भकांची आई झाली पोरकी!

30
A digital collage-style thumbnail featuring a prominent hospital sign reading
पैसे नसल्याने माणुसकी हरली!

Dinanath Mangeshkar Hospital Negligence Case: पुणे हादरले! एका हृदयद्रावक घटनेने पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पैशांच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. वेळेवर उपचार न मिळाल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, आणि तिच्या नवजात जुळ्या मुली जन्मतःच आईच्या मायेला मुकल्या. या संतापजनक घटनेमुळे रुग्णालयाच्या कार्यशैलीवर आणि पुण्यातील वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मोनाली उर्फ तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तातडीने दीनानाथ रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयाने उपचारापूर्वी तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली. महिलेच्या पतीने तात्काळ अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, परंतु रुग्णालय प्रशासनाने या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. याच दरम्यान, महिलेची तब्येत अधिक बिघडली.

अखेरीस, कोणताही पर्याय न उरल्याने कुटुंबीयांनी तनिषा यांना वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेळेत रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात न्यावे लागले. सूर्या हॉस्पिटलमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे तनिषा यांनी दोन गोंडस मुलींना जन्म दिला. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. जवळच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करेपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तनिषा यांनी जगाचा निरोप घेतला.

पैसे नसल्याने माणुसकी हरली! गर्भवतीचा बळी, नवजात पोरकी;

एकीकडे दोन चिमुकल्यांच्या जन्माचा आनंद, तर दुसरीकडे त्यांच्या आईच्या निधनाचे मोठे दुःख… या दुहेरी आघाताने भिसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीनानाथ रुग्णालयाने दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे एका तरुण आईचा जीव गेला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या गंभीर घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून, त्यांनी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पोलीस सहआयुक्तांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली असून, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी या आरोपांचे खंडन केले असून, महिलेची शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक होती आणि नातेवाईकांकडून चुकीचे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर केल्याचेही सांगितले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे दीनानाथ रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर आणि खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचा मानवी जीव आहे, हे या रुग्णालयाला कधी कळणार, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा