‘त्या’ प्रकरणी ‘आप’ला DIP ची वसुलीची नोटीस; दहा दिवसात जमा करावी लागणार रक्कम

नवी दिल्ली, १२ जानेवारी २०२३ :दिल्ली सरकारच्या DIP म्हणजेच, माहिती आणि प्रचार संचालनालयाने केजरीवालांना (आप सरकार) सुमारे १६४ कोटी रुपयांची वसुली नोटीस जारी केली आहे. तसेच ही रक्कम १० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात सरकारी जाहिरातींच्या आडून आपच्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाला एकूण १६४.६२ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे.

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी मुख्य सचिवांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठी आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही घडामोड घडली. दरम्यान, उपराज्यपालांच्या निर्देशानंतर, दिल्ली सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयाने ही नोटीस जारी केली.

  • नाहीतर आपची मालमत्ता होणार जप्त

माहिती आणि प्रचार संचालनालयाने (DIP) जारी केलेल्या वसुलीच्या नोटीसमध्ये रकमेवरील व्याजाचा समावेश असून, दहा दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक असणार आहे. आम आदमी पार्टीचे निमंत्रक तसे करण्यात अपयशी ठरल्यास आपची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा