पुणे २७ फेब्रुवारी २०२५: महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना आता थेट तुरुंगवासाला सामोरे जावे लागणार आहे. वीज ग्राहकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महावितरणच्या अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी महावितरणने कठोर पाऊल उचलले आहे. थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्यास गंभीर परिणाम
महावितरणचे कर्मचारी थकीत वीज बिल वसुलीसाठी घरोघरी जात आहेत. अनेक ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नसल्यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. मात्र, या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार गंभीर असून, शासकीय कामात अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
दोषींवर कठोर कारवाई
सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे, धमकी देणे, कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे, अनधिकृत जमाव गोळा करणे आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या कलमांन्वये दोषींना दोन ते दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य करावे आणि वेळेवर वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे