दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्याशी सहमत नाही: राहुल गांधी

जम्मू, २४ जानेवारी २०२३ पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकबाबत दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. दिग्विजय सिंह जे काही बोलतात त्याच्याशी आपण अजिबात सहमत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. माझ्या देशाच्या लष्करावर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाचे लष्कर कोणतेही ऑपरेशन करते, त्याचे पुरावे देण्याची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले दिग्विजय सिंह ?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले होते की, ते (भाजप) सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतात. ते अनेकांना मारल्याबद्दल बोलतात, पण त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. ते खोटे बोलून घेऊन राज्य करत आहेत. त्याच वेळी, भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. अशा टिप्पण्यांवरून असे दिसून आले की, देशातील राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पदयात्रा ही केवळ नावापुरती भारत जोडो यात्रा होती, तर ते आणि त्यांचे सहकारी देश तोडण्याचे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

  • हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक विधान

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान राहुल गांधी यांना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. माझा देशाच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आरोप केला की, हा खरं तर ‘ब्रेक इंडिया’चा प्रवास आहे. ते म्हणाले, जर ते सैन्यदलाविरोधात बोलले तर भारत खपवून घेणार नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस पंतप्रधान मोदींचा द्वेष करतात, पण द्वेषाने ते इतके आंधळे झाले आहेत की देशाप्रती त्यांचे समर्पण कमी झाले आहे. राहुल आणि काँग्रेसचा आमच्या शूर सैन्यावर विश्वास नाही. त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करून भारताच्या नागरिकांचा आणि आपल्या सशस्त्र दलांचा अपमान केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा