मुंबई, २३ सप्टेंबर २०२०: मराठी सिनेसृष्टीचे अष्टपैलू अनिनेते सुबोध भावे हे आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट करणार आहेत. आज दि. २३ सप्टेंबर २०२० ला दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी त्यांनी एक ट्विट केलं. यात त्यांनी स्वतःचं ट्विटर अकाउंट डिलीट करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सुबोध भावे हे अष्टपैलू अभिनेते तर आहेच सोबतच ते एक अभ्यासू आणि जागृत नागरीक आहेत. समाजात घडत असलेल्या विविध विषयांवर ते आपली परखड मतं मांडत असतात. आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधने, चर्चा करणे यासाठी ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तर बरेच ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या अचानक ट्विटर डिलीट करण्याच्या घोषणेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना ट्विटर अकाऊंट डिलीट न करण्याची विनंतीही केली आहे.
अभिनेते सुबोध भावेंनी आपलं ट्विटर अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय का घेतला याचं स्पष्ट कारण अजूनतरी त्यांनी जाहीरपणे सांगितलं नाही. मात्र एका मराठी वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार ”ट्विटरवर वाढत असलेल्या नकारात्मकतेमुळे” त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय. ट्विटरवर सुबोध भावे यांचे सध्या 94.6K फॉलोवर्स आहेत. त्यामुळे हे अकाउंट डिलीट केल्याने एवढ्या मोठ्या संख्येने फॉलोवर्स सुबोध भावेंना गमवावे लागतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे