गोविंदांच्या हाती निराशा, यंदाही दहीहंडीवर निर्बंध…

15
मुंबई, २४ ऑगस्ट २०२१: राज्यात करोनाची दुसरी लाट उतरणीला लागली आहे. त्यानुसार राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी सण- समारंभांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांनी सरकारकडे के ली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सोमवारी गोविंदा पथकांशी संवाद साधला.
यावेळी गोविंदांच्या हाती निराशा लागली. यंदाही दही हंडीवर निर्बंध असणार आहे. ‘काही काळासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले, हा संदेश जगाला देऊया,’ असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात यंदाही दहीहंडीला परवानगी दिली जाणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
“जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू, मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करु, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यायला हवा”, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आपले सण आपण जपलेच पाहिजेत. पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करत आपण आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची अवस्था आपण पाहायला हवी. लसीकरण झालेलं असतानाही काही देशांमध्ये लॉकडाऊन लावावं लागलं  आहे. तर इस्रायलनं पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केली आहे. आपण जर आता समजुतीनं घेतलं नाही आणि त्यानुसार वागलो नाही तर धोका अटळ आहे”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा