सोलापूर, ८ सप्टेंबर २०२० : उजनी धरणामध्ये वरच्या धरणांकडून होणारा पाण्याचा विसर्ग अद्यापही कायम आहे. सोमवारी (ता.७) हा विसर्ग जवळपास ६५२८ क्युसेक इतका झाला आहे . दरम्यान, धरणाची पाणी पातळी १११ टक्क्यांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे धरणाचे १६ दरवाजे उघडले असून, १५,००० क्युसेकने हे पाणी पुढे भीमा नदीत सोडण्यात येत आहे. पाण्याच्या वाढत्या विसर्गामुळे नदीकाठी पूरस्थितीची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्याने या धरणांतून अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आठवड्यापूर्वीच धरण १०० टक्के भरले होते. दौंडकडून धरणात गेल्या आठवड्यात पाण्याचा विसर्ग १६ हजार क्युसेक इतका होता. सध्या तो ६५२८ क्युसेकपर्यंत कमी केला असला, तरी त्यात सातत्य आहे. परिणामी, धरणाची पातळी १११ टक्क्यांपुढे गेली आहे. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तसेच वीजनिर्मिती, मुख्य कालवा, सीना-माढा योजना, बोगदा यासाठीही पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाच्या एकूण ४१ दरवाजांपैकी रविवारी ११ दरवाजे उघडण्यात आले होते. सोमवारी सकाळी मात्र १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १५,००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोमवारची धरणातील पाणी स्थिती
पाणी पातळी ४९७.३२० मीटर
एकूण पाणी साठा १२३.१५ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ५९.५० टीएमसी
टक्केवारी १११.०५ टक्के
न्यूज अनकट प्रतिनिधी: