नवी दिल्ली, दि. १७ जून २०२०: NTA म्हणजेच, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या असे लक्षात आले आहे की, १५ जून २०२० ही तारीख असलेले एक बनावट सार्वजनिक परिपत्रक, ज्यावर, “नीट म्हणजेच, राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश प्रक्रिया चाचणी, UG जुलै-२०२० पुढे ढकलण्यात आल्याबद्दल” असा विषय लिहिला आहे, हे परिपत्रक विविध माध्यमे आणि समाज माध्यमांवरून पसरवले जात आहे.
या बनावट परिपत्रकाची NTA ने गंभीर दाखल घेतली असून या बनावट परिपत्रकाचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे खोटे परिपत्रक तयार करुन ते पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.
सर्व उमेदवार, पालक आणि सर्वसामान्य लोकांना हे सूचित केले जात आहे की अशाप्रकारचा कुठलाही निर्णय NTA अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. त्यांनी जनतेला अशी विनंती केली आहे की, अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नका, ते पुढे पाठवू नका. याबाबत सत्य आणि अधिकृत माहितीसाठी NTA च्या www.nta.ac.in आणि ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. असे NTA कडून सांगण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी