पुणे : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर बैठक घेतली.
बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच रुग्ण संख्येत भर पडू नये, यासाठी काही दिवस शहरातील गर्दीचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती घडवण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद यावर भर देण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीमध्ये समन्वय आणि सुसूत्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिया कमी कराव्यात, जेणेकरून
कोरोना बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, बधिरीकरण तज्ञ व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देता येतील.
डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांनी अतिदक्षता विभागात कामाचे ज्ञान घेतलेल्या प्रशिक्षित परीचारकांच्या नावांची यादी प्रशासनाला सादर करावी. तसेच सध्याच्या परिस्थितीत केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच रुग्णालयात कराव्यात व खाटा उपलब्ध ठेवाव्यात, या कामी इंडियन मेडिकल असोसिएशनने समन्वयाची भूमिका पार पाडावी.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक सुभाष साळुंखे म्हणाले, सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करणे जरुरीचे आहे.
नवले हॉस्पिटल चे डॉ. डी. बी. कदम म्हणाले, रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी केली जात असून संशयित रुग्णांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग, पुरेशा खाटा राखीव ठेवणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कार्यवाही आराखडा तयार ठेवायला हवा, असेही ते म्हणाले.
भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.संजय ललवाणी म्हणाले, रुग्णालयात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून अंतर्गत विविध विभागांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी आयएमए चे डॉ.संजय पाटील, ए एफ एम सी चे आर एम गुप्ता, डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध रुग्णालयांच्या प्रमुखांनी उपाययोजनांबद्दल माहिती दिली.