विधान परिषदेसाठी पुणे काँग्रेसकडून बागुल, बागवे, छाजेड यांच्या नावाची चर्चा

पुणे, दि.६ मे २०२०: विधान परिषदेच्या २१मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांमध्ये नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात पुण्यातून विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून तीन दिग्गजांची नावे सध्या चांगलीच चर्चेत आली आहेत. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड आणि माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांच्या नावाची चर्चा आहे.

हे तिघेही काँग्रेस पक्षाचे निष्ठवंत म्हणून ओळखले जातात. त्यात आबा बागुल हे गेल्या ३० वर्षांपासून महापालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू आणि आक्रमक भाषणे करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघ गेले ३५ वर्षांपासून आरक्षित होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता येत नव्हती.

विधान परिषदेसाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी वरिष्ठांकडे कळविले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी त्या संदर्भात बोलले असल्याची ही माहिती समजते आहे. त्यामुळे पूर्वीचेच उमेदवार पुन्हा देण्यापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ आणि सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी पुण्यातून होऊ लागली आहे.
तसेच माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनीही पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर दिला आहे.
राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला पुण्यात ताकद देण्याची मागणी करण्यात येत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत बागवे यांचा कॅन्टोन्मेंट मतदार संघातून अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता. ऐनवेळी पक्षातून पक्षांतर झाल्याचा फटका बागवे यांना सहन करावा लागला होता.

पुण्यातून ऍड. अभय छाजेड यांनीही पक्षासाठी चांगले काम केले आहे. निष्ठावंत व अभ्यासपूर्ण कार्यकर्ता म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे. काँग्रेसबाबतची कोणतीही भूमिका ते सातत्याने मांडत असतात. याशिवाय ते सर्व कार्यक्रमांनाही ते हजेरी लावताना पहायला मिळत आसतात. त्यांनीही विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या चर्चा आता समोर येऊ लागल्या आहेत.
सध्या देशात कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही विधान परिषदेचीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. २१ मे रोजी ९ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.

विधान परिषदेसाठी ४ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा