मुंबई, १ सप्टेंबर २०२२: राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून २२ सप्टेंबरला निवडणुकीची अतिसूचना जाहीर होनार आहे तर १७ ऑक्टोबरला मतदान होऊन, नवीन अध्यक्ष विराजमान होणार आहे. या पदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावाची, चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. परंतु महाराष्ट्रातील काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःहून आपण या स्पर्धेत नसल्याचा खुलासा केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुशील कुमार शिंदे, नाना पटोले यांच्या बरोबरच मुकुल वासनिक यांच्या नावासाठी सोनिया गांधी विचार करत असल्याची माहिती कळते. यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु नाना पटोले यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी माझ्या नावाची चर्चा झाली ही फक्त एक अफवा आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी आमची इच्छा आहे. खासदार राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावेत ही ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षामध्ये केंद्रीय पातळीवर सुशील कुमार शिंदे आणि मुकुल वासनिक हे नेते सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटची मानले जातात. त्याच बरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या नेत्यांच्या नावाची चर्चा असल्याचं समजते.
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते राहुल गांधीं यांच्यावर नाराज आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या बदलत्या ध्येयधोरणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला. वारंवार पक्षांतर्गत कलह उफाळून येत असतात. अशा परिस्थितीत ही मोठी चर्चा सुरू झाली. यातच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नावांची चर्चा असल्याचे समजते. नाना पटोले यांचे नावही यावेळी आघाडीवर आहे. परंतु नाना पटोले यांनी स्वतःच स्पष्टीकरण देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर