कल्याण-डोंबिवली, दि. २७ जुलै २०२०: कल्याण-डोंबिवली मधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केडीएमसीने नुकताच कडक लॉकडाउन अवलंबला होता. धारावी पॅटर्न वापरून वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवलीत जंतुनाशक-धूर फवारणी मोहीम पार पडली.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत जंतुनाशक आणि धूर फवारणी मोहीम राबविण्यात आली. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या पहिल्या टप्प्यातील मोहिमेला प्रारंभ झाला. तर पुढच्या रविवारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात मांडा टिटवाळा, कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिम परिसरात अशीच मोहीम राबवली जाणार आहे. या विशेष मोहिमेसाठी, फवारणीसाठी नागरिकांनी आज रस्त्यावर गर्दी करू नये, रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कल्याण पश्चिमेत अग्निशमन दलाचे ७ फायर टेंडर, ३५ कर्मचाऱ्यांनी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी केली. तर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ३१ सिटीगार्ड जेट मशीन, ४ जीप मोउंटेड फॉगिंग मशीन तसेच छोट्या गल्ली बोळात ५ हँडपंप मशीन आणि ३५ हँड फॉगर मशीनच्या मदतीने धुरावणी करण्यात आली.
तर डोंबिवली पूर्वेत ही जंतुनाशक- धूर फवारणी करण्यात आली. ज्याची डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकातून सुरुवात झाली.
नागरिकांनी देखील या जंतुनाशक-धूर फवारणी मोहीमेला चांगलाच पाठिंबा दिला आहे. त्यांनी घरात राहून कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यामुळे या मोहीमेबद्दल नागरिकांना विचारले असता त्यानी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक केल्याचे पाहायला मिळाले. लवकरात लवकर ही वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी असे ही त्यांनी या वेळेस सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे