उरुळी कांचन (पुणे), २८ एप्रिल २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात ग्रामीण भागातील महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे विशेषत मासिक पाळीच्या दिवसांत दुर्लक्ष होऊ नये यासाठी सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीने घरोघरी प्रति महिला पाच मोफत सॅनिटरी नॅपकिनच घरपोच वाटप सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन दीड हजार महिलांना साडेसात हजार सॅनिटरी नॅपकिनच वाटप करण्यात आले. याबाबत सरपंच सुदर्शन चौधरी यांनी माहिती दिली की गावातील आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वाडी वस्त्यावर जाऊन सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात साडेसात हजार तर पुढील आठ दिवसांत उर्वरित गाव व परिसरातील दीड हजाराहून अधिक महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप घरपोच करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून ग्रामपंचायत पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे ‘न्यूज अनकट’ शी बोलताना सोरतापवाडी गावचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे