लोणी काळभोर, दि. २५ जून २०२० : महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागा अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन लोणी काळभोर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना खत वाटपाचा शुभारंभ झाला व अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना सर्व प्रकारची खते, शेती उपयोगी औषधे स्वस्त दरात मिळावीत यासाठी गावपातळीवरील विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून यापुढील काळात गावोगावी ना नफा- ना तोटा या तत्वानुसार खत व शेती उपयोगी औषध विक्री सुरु करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अनिल कवडे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, उपसंचालक डॉ. अमोल यादव, विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे, उपनिबंधक डॉ. राजाराम धोंडकर, शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राहुल काळभोर, उपाध्यक्ष राजेंद्र केसकर, संचालक विठ्ठल काळभोर, प्रताप बोरकर, श्रीरंग काळभोर, आनंदा काळभोर, बाळासाहेब काळभोर, धोंडिबा काळभोर, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल कवडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या राज्यातील अपवाद वगळता सर्वच विविध कार्यकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. गावपातळीवर सहकारी संस्थांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना खते, औषधे व बी बियाणे हे वाजवी दरात पुरवून त्यांच्या उत्पादीत शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थांचा उपयोग केला जाणार आहे. शेतक-यांनी शेतात पिकवलेला भाजीपालाही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहरातील गृहनिर्माण संस्थांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करुन शेती मधील उत्पादन खर्च कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या साठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आता काळानुरुप बदलण्याची गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे