सातारा, दि. १० मे २०२०: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताकरीता रस्त्यावर भर ऊन्हात उभे राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री ना. देसाई यांच्यावतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरन्ट चौकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले.
जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, माण खटाव, कोरेगांव, फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत सुमारे १८७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लस्सीचे वाटप करण्यात आले. राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्याकडून नेहमीच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात.
कोरोनाचे संकट वाढत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरीता त्यांच्या आरोग्याची विचारपुस करण्याकरीता ना. देसाई यांनी त्यांच्या संरक्षणाकरीता असणारा सर्व लवाजमा बाजूला ठेवून स्वत: दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना? याची विचारपुस करुन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविले.
न्यूज अनकट प्रतिनिधी