माढा, दि. १४ सप्टेंबर २०२०: दिवसेंदिवस कोरोना या महामारीचा संसर्ग सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही वाढत चाललेला असून, कोरोना बाधीत रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर उघडण्यात येत असून कोव्हीड सेंटरमधील कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशिय सांस्कृतिक मंडळ निमगांव व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत माढा मतदारसंघातील महाळूंग (श्रीपूर), ता. माळशिरस येथील कोव्हीड सेंटरसाठी एक ऑक्सिजन मशिन पुरविण्यात आले. सदर प्रसंगी महाळुंगचे उपसरपंच शरद मुंडफणे, माजी उपसरपंच राहूल रेडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले, आपल्या सोलापूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून माढा मतदारसंघातील महाळुंग (श्रीपूर), ता.माळशिरस येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरसाठी एक ऑक्सिजन मशिन पुरविण्यात आलं आहे. या ऑक्सिजन मशिन्स जशा उपलब्ध होत आहेत त्यानुसार कोव्हीड सेंटरना पुरविण्यात येत आहेत. सध्या कोरोना या आजारामुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. कोव्हीड सेंटरसाठी पुरविण्यात आलेलं मशिन हवेतून ऑक्सिजन घेवून त्यावर कार्य करत आहेत. त्यासाठी वेगळ्या ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता नाही. कोव्हीड सेंटरमधील ज्या कोरोना रूग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे त्यांना या मशिनद्वारे ऑक्सिजन पुरविणे सोईचे होणार आहे.
याबरोबर माढा मतदारसंघातील कुर्डूवाडी येथील संकेत मंगल कार्यालय, श्रीराम मंगल कार्यालय, माढा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरला ऑक्सिजन मशिन्स पुरविण्यात आली असून कोरोनाग्रस्त रूग्णांना त्याचा चांगला लाभ होत असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील