पुरंदर तालुक्यात जिल्हा बंदीची ऐसीतैशी

पुरंदर, दि.२ मे २०२०: राज्य सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना केल्या आहेत. प्रथम जमावबंदी व नंतर संचारबंदी जाहीर करून लोक एकत्र येणार नाही या बाबत दक्षता घेतली. त्यानंतर जिल्हा बंदी सुद्धा केली. अनेक ठिकाणी नाका बंदी केली आहे. पण चोर मार्गाचा वापर करीत लोक जिल्हा बंदीचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोरोना पुणे आल्यानंतर अनेक दिवस सातारा जिल्हा कोरोना मुक्त होता. साता-यामध्ये पहिला रूग्ण सापडल्यानंतर सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी तपसणी नाके तयार करण्यात आले आहेत. पोलिस रात्र-दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.साता-यामध्ये पुण्यातून गेलेल्या लोकांमुळे कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस जागता पहारा देत आहेत. मात्र हा पहारा चुकवत अनेक नागरीक पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.

पुणे सातारा सीमेवर निरा नदी काठी पोलिस पहारा देत असले तरी निरा नदीकाठच्या दत्तमंदीराच्या पश्चिम बाजुकडून व रेल्वे मार्गाचा उपयोग करीत लोक नीरा शहरात प्रवेश करीत आहेत. बारामती तालुक्यातील निंबुत येथील बंधारा व  पुरंदर मधिल पिंपरे व जेऊर येथील बंधाऱ्याचा उपयोग करून दोन्ही जिल्ह्यातील लोक आलिकडे पलिकडे करीत आहेत. लोकांचा निष्काळजीपणा करीत आपले व आपल्या आप्तजनांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेवरचा ताणही वाढवत आहेत.खर तर कोरोनाला  शहरापुरताच मर्यादित ठेवून तिथेच  त्याचा शेवट करायचा असेल तर जनतेने स्वतःला आवरायला हवे.
प्रशासनाला सहकार्य करायला हवे. व्यवसायीक  फायद्याला बाजुला ठेवत जिव वाचवण्यास किंवा कोरोनापासून दुर राहण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे.

अत्यावश्यक सेवेखाली जिल्हा बंदीचे उल्लंघन

लाॅकडाऊन नंतर लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी शासनाने काही अत्यावश्यक सेवा देणा-या लोकांना पास दिले. या पासचा दुरूपयोग होत असल्याचे फलटण तालुक्यात सापडलेल्या कोरोना रूग्णाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. पुणे येथे अग्नीशमन दलात काम करणारा जवान पुणे ते फलटण दररोज येवून जावून करित होता तीथे त्याने आपल्या कुटुंबा समवेत इतरांचा जीव धोक्यात घातला .तसेच तरकारी व फळ विक्रेते जिल्हा बंदीचे उलंघन करीत सतत फिरत आहेत. यावेळी ते सोशल डिस्टंसींग पाळताना  व मास्क वापरताना दिसत नाहीत. ग्रामीण भागात फिरून तरकारी  विकणारा विक्रेता आजही तोंडाला मास्क न लावता गावोगाव फिरतो आहे. तर लोकही त्याच्या भोवताली घोळका करत आहेत.अशा लोकांपुढे शासन हतबल झाल्या शिवाय रहाणार नाही.

कोट…

लाॅकडाऊनच्या काळात लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नाका बंदी केली जातेय. तरी देखील लोक चोर वाटांचा उपयोग करून किरकोळ कारणासाठी  बाहेर पडताना दिसत आहेत. अशा लोकांना कितीही समजवले तरी काही उपयोग होताना दिसत नाही. अशा लोकांवर आम्ही कारवाई करतोच आहे. पण केवळ कारवाई करून उपयोग नाही.लोकांनी हे समजून घ्यायला हवे की, घरा बाहेर पडून आपण स्वतःचा व आपल्या नातलगांचा जीव धोक्यात घालत आहोत. आजची काळजी उद्याचा दिवस पहाण्याची संधी देणार आहे. हे जीवन पुन्हा नाही एवढच लोकांनी लक्षात घ्यावे.

– अंकुश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ,जेजुरी पोलिस स्टेशन

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा