पुणे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी!

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) नुसार ५ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, तलवारी, बंदुका, भाले किंवा शारीरिक इजा पोहोचेल अशी कोणतीही वस्तू बरोबर घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही व्यक्तीचे किंवा नेत्याचे पुतळे, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन किंवा दहन करण्यासही मनाई आहे.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे, किंवा ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो अशा कोणत्याही कृती करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश जिल्ह्यात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे