पुणे, दि.१६ मे २०२० : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूर व कामगारांसाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेमार्फत नाष्टा व जेवण गेल्या ५० दिवसांपासून पुरविण्यात येत आहे. तेथील कम्युनिटी किचनला आज(शनिवारी) विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी डिक्की संस्थेचे संस्थापक डॉ. मिलिंद कांबळे व अन्य सहकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे बेघर, हातावर पोट असणारे नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री महोदय तसेच प्रशासनातील अधिकारी विविध उपाययोजना करत आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी पुणे शहरातील ७ निवारा गृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंपाकगृहातून २८ मार्चपासून आतापर्यंत निवारागृहातील लोकांसाठी नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील ९०० आदिवासी कुटुंबांना तर पुणे शहरातील १२९ वस्त्यांतील १५ हजार ५०९ कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, दाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले आहे.
या संस्थेमार्फत आतापर्यंत १ लाख १४ हजार ३७७ फुड पॅकेट व १५ हजार ५०९ किराणा मालाचे किट असे एकूण १ लाख ७६ हजार ४१३ नागरिकांना सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक कांबळे यांनी दिली.
येरवड्यातील मदर तेरेसा समाज मंदिर, क्रांतीवीर लहूजी वस्ताद शाळा, साळवे इ लर्निंग स्कूल, तसेच नानासाहेब परुळेकर स्कूल (विश्रांतवाडी) आणि वडगाव शेरीतील आचार्य आनंदऋषी शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे नाष्टा आणि दोन वेळचे भोजन वितरित केले जाते. यासाठी डिक्कीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा ४० जणांचा गट सहकार्य करत आहे. त्यामध्ये राजेश बाहेती, अनिल ओव्हाळे, राजू साळवे, अमित अवचरे, महेश राठी, कौस्तुभ ओव्हाळे, राजू वाघमारे, मैत्रयी कांबळे आणि सीमा कांबळे यांचा सहभाग आहे.
डिक्की संघटनेच्या प्रत्येक राज्यात शाखा असून ७ देशात ही संघटना पोहोचली आहे. सुमारे एक लाखांहून अधिक उद्योजक या संघटनेचे सदस्य आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून सध्या बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची जबाबदारी डिक्की संस्थेने उचलली आहे, असे कांबळे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: