Chikhli Family Court Success in Preventing Divorces: नात्यांमध्ये दुरावा आला की अनेकजण घटस्फोटाचा अर्ज दाखल करतात. पण, चिखलीच्या कौटुंबिक न्यायालयात एक वेगळीच गोष्ट घडतेय!
इथले मध्यस्थ केवळ कागदपत्रांवर सह्या घेत नाहीत, तर तुटलेल्या मनांना जोडण्याचा प्रयत्न करतात. विचार करा, निम्म्याहून जास्त घटस्फोटाचे अर्ज तर केवळ बोलण्याने आणि समेट घडवण्याने निकाली निघताहेत.
अनेकदा घरात नवरा-बायकोमध्ये खटके उडतात, गैरसमज वाढतात आणि मग ‘आता काही खरं नाही’ असं वाटून घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. अशा वेळी न्यायालयात असलेले समुपदेशक आणि मध्यस्थ दोघेही बाजू ऐकून घेतात आणि दोघांनाही पटतील अशा तोडग्यांवर काम करतात. ज्या बायका नोकरी करत नाहीत, त्यांच्या भविष्याचा विचार करतात. मुलांना कोणाकडे ठेवायचं, यावर भांडणं होऊ नयेत म्हणून दोघांनाही समजावतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या पाच वर्षांत बघितलं तर २०२३ मध्ये सर्वात जास्त घटस्फोटाचे दावे मिटले! म्हणजे, मध्यस्थांनी खरंच कमाल केली आहे. न्यायालयात ४२ जाणकार लोक आहेत – न्यायाधीश आणि वकील – जे हे काम करतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, घटस्फोट मिळतो कधी? तर कायद्यानुसार, जेव्हा दोघांमध्ये समेट होण्याची कोणतीच शक्यता नसते, तेव्हा न्यायालय लगेच घटस्फोट देऊ शकतं. त्यासाठी सहा महिन्यांची वाट बघायची गरज नसते. जर नवरा-बायको वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ वेगळे राहत असतील किंवा दोघांनाही घटस्फोट हवा असेल, तर त्यांचा विवाह कायद्यानुसार मोडला जाऊ शकतो.
म्हणायला ‘सात जन्माचं नातं’ असतं, पण एका अर्जावर ते तुटण्याची वेळ येते. मात्र, चिखलीच्या कौटुंबिक न्यायालयात हे नातं वाचवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यशही येत आहे,
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे