दिवाळी म्हणजे उत्साहाचा आणि स्वादिष्ट फराळाचा काळ! पण या चविष्ट, गोड-तिखट पदार्थांचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः शरद ऋतूमध्ये शरीरात पित्तप्रकोप स्वाभाविकपणे वाढलेला असतो आणि त्यातच तेलकट, गोड, तिखट फराळाची भर पडल्यास अॅसिडिटी (पित्त) चा त्रास वाढतो, ज्यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होऊन थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो.
डॉ. शरद दराडे (आहारतज्ज्ञ) यांच्या मते, दिवाळीत गोड आणि तळलेले पदार्थ अर्थात कॅलरीज वाढवण्यास कारणीभूत ठरतात, परिणामी वजन झपाट्याने वाढू शकते. चकली, चिवडा, शेव, लाडू, करंजी यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन टाळणे आवश्यक आहे. पित्त वाढण्यामागे उष्ण, तळलेले, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, अनियमित जेवण, जागरण आणि मानसिक ताण ही मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होतात.
या सोप्या टिप्स नक्की पाळा
- प्रमाण मर्यादित ठेवा: फराळ लहान वाटीत घ्या. गोड आणि तिखट पदार्थ एकत्र खाणे टाळा.
- घरगुती उपाय: अॅसिडिटी झाल्यास लिंबूपाणी किंवा योग्य प्रमाणात ताक प्या. कोमट पाण्यात जिरेपूड आणि मीठ घालून प्यायल्यास आराम मिळतो.
- व्यायाम महत्त्वाचा: दिवाळीच्या व्यस्ततेतही नियमित व्यायामासाठी थोडा वेळ काढा. यामुळे कॅलरीज बर्न होतात.
- संतुलन: जेवणानंतर लगेच न बसता काही वेळ चालणे, पुरेसे पाणी पिणे आणि पचनासाठी सुंठ, जिरे, ओवा यांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते.
आयुर्वेदाचार्य अनुपमा हिंगणकर यांच्या मते, संयम, प्रमाण आणि संतुलित आहार हेच दिवाळीचा आनंद घेण्यासाठी आरोग्याचे रहस्य आहे. विशेषतः उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी पथ्य-पाणी पाळणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी आणि हलके, पौष्टिक जेवण घ्या.
या दिवाळीत फराळाचा आस्वाद घ्या, पण आरोग्याचे संतुलन राखून!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































