दिवाळी फराळाने टपाल विभागाला मिळाले ७२ लाखांचे उत्पन्न!

अमेरिकन ‘टेरिफ’चा फटका, तरीही उत्पन्नात १०% ची मोठी वाढ.

पिंपरी चिंचवड ३० ऑक्टोंबर २०२५ : पिंपरी चिंचवड (पूर्व) टपाल विभागाने यंदाच्या दिवाळीत परदेशातील भारतीयांना फराळ आणि भेटवस्तू पाठवून विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. केवळ एका महिन्यात तब्बल १७ देशांमध्ये दिवाळी फराळासह विविध वस्तू पाठवून विभागाने ७२ लाख ९२ हजार ५१९ रुपयांचे उत्पन्न कमावले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या ६० लाख रुपयांच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

यावर्षी १९६६ ग्राहकांनी स्पीड पोस्ट पार्सल सेवेद्वारे ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, इंग्लंड, कॅनडा यांसारख्या १७ प्रमुख देशांमध्ये आपल्या प्रियजनांना दिवाळीचा गोडवा पाठवला.

‘टेरिफ’ संकटामुळे अमेरिकेतील महसूल घटला

टपाल विभागाला यंदा अमेरिकेच्या टेरिफचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी पुणे विभागातून एकट्या अमेरिकेतून ५५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते, पण यावर्षी अमेरिकेतील टेरिफ संकटामुळे विभागाने सुरुवातीला पार्सल पाठवण्यास स्थगिती दिली होती. नंतर टेरिफमधील सूट ग्राहकांना समजावून सांगण्यात आली. परिणामी, यंदा अमेरिकेतून केवळ ४ लाख ४२ हजार रुपयांचा महसूल मिळाला.

जनसंपर्क अधिकारी नितीन बने यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टेरिफचे निर्देश पाळून भारतीय टपाल विभागाने पार्सल पाठवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. जर हा टेरिफचा अडथळा नसता, तर टपाल विभागाच्या उत्पन्नात एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची भर पडली असती. तरीही, अन्य देशांमधून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे टपाल विभागाने आपली आर्थिक वाढ कायम ठेवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे