आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्यांना प्रशासनाचे ज्ञान असतेच असे नाही, याचा प्रत्यय नोबेल पुरस्कार विजेते, बांगला देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहंमद युनूस यांच्या उदाहरणावरून येत आहे. हंगामी सरकारचे प्रमुख असलेले युनूस हे ‘मुस्लिम ब्रदरहूड’च्या हातचे बाहुले बनले असून, ज्या भारतामुळे बांगला देश जगाच्या नकाशावर आला, त्या भारताशी जाणीवपूर्वंक पंगा घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. अत्याचार करणाऱ्याशी हातमिळवणी आणि मदत करणाऱ्याबाबत कृतघ्नता असे बांगला देशाचे सध्याचे वागणे असून, आता भारताची पूर्वेकडील राज्ये बांगला देशाच्या नकाशात दाखवण्याइतका मुजोरपणा युनूस यांनी केला आहे.
भारत एकीकडे शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना शेजाऱ्यांच्या कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनने भारताचा बराच भाग त्याच्या नकाशात दाखवला. अरुणाचल प्रदेश तसेच लडाखलगत गावे वसवली. पायाभूत सुविधा केल्या. नेपाळने भारताचा भूभाग त्याच्या नकाशात दाखवला. पाकिस्तानशी तर आपला वाद सुरूच आहे. बांगला देशात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या हसीना शेख यांचे सरकार तिथल्या युवकांनी आरक्षणाच्या मुद्दयावरून उलथवून टाकले आणि तिथे हंगामी सरकार स्थापन झाले. भारताने हसीना यांना आश्रय दिल्यामुळे बांगला देशाचे पित्त खवळले आहे. बांगला देशाच्या हंगामी सरकारने तेव्हापासून भारताशी वैरत्व सुरू केले आहे. हंगामी सरकारचे प्रमुख युनूस यांनी पाकिस्तान आणि चीनशी हातमिळवणी करून भारताविरोधात धोरण घेतले आहे.
चीनच्या दौऱ्यात भारताच्या पूर्वेकडील राज्यांत गुंतवणूक करण्यास चीनला निमंत्रण देतानाच त्यांचा अप्रत्यक्षरीत्या भारताच्या या राज्यांवर दावा होता, हे आता स्पष्ट झाले आहे. आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना ‘ग्रेटर इस्त्रायल’चे स्वप्न पडते, तसेच स्वप्न बांगला देशाच्या हंगामी सरकारचे प्रमुख युनूस यांनाही पडत आहे. बाराव्या, तेराव्या शतकाचे संदर्भ देत, भारताचा भाग बांगला देशाचा दाखवून ‘ग्रेटर बांगला देश’ करण्याचे स्वप्न हे अलिकडच्या काळात पाहणे हा मूर्खपणा आहे. ‘मुस्लिम ब्रदरहूड’च्या नादी लागून युनूस बांगला देशाला गतवैभव मिळवून देण्याऐवजी गाळात घालतील, अशी चिन्हे आहेत. भारत आणि बांगला देशातील राजनैतिक मतभेदाचा शोध घेत एक नवीन वाद सुरू झाला आहे. हा वाद कोणत्याही अधिकृत विधानाशी किंवा सीमा वादाशी संबंधित नाही, तर तो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या नकाशावरून उद्भवला आहे.
युनूस यांनी अलिकडेच पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना एक पुस्तक भेट दिले. या पुस्तकाचे शीर्षक ‘द आर्ट ऑफ ट्रायम्फ’ आहे. या भेटवस्तूमुळे खळबळ उडाली. कारण मुखपृष्ठावर आसाम आणि भारताच्या ईशान्येकडील अनेक भाग बांगला देशचा भाग म्हणून दाखवणारा नकाशा होता. युनूस यांनी पाकिस्तानी जनरलला सादर केलेल्या या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२४ मध्ये बांगला देशातील व्यापक विद्यार्थी चळवळीतील छायाचित्रे आणि घटनांचे हे संकलन आहे. ही तीच चळवळ आहे, जिने दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शेख हसीना सरकारला सत्तेवरून काढून टाकले आणि सार्वजनिक दबावातून युनूस यांच्याकडे अंतरिम नेतृत्व सोपवले. आताच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे पाहता प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुखपृष्ठावर छापलेला नकाशा साधा ग्राफिक दिसत नाही. तो एक स्पष्ट राजकीय दृष्टिकोन दर्शवितो. हा नकाशा ‘ग्रेटर बांगला देश’ च्या वादग्रस्त संकल्पनेचे प्रतिबिंबित करतो, जो बांगला देशच्या सीमा त्याच्या सध्याच्या भूगोलाच्या पलीकडे पसरलेल्या म्हणून कल्पित करतो. या संकल्पनेत आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशाचे अनेक प्रदेश आणि म्यानमारचा अराकान प्रदेश यांचा समावेश आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या नावाखाली विस्तारवादी प्रादेशिक महत्त्वाकांक्षांना या कल्पनेने वैचारिक पाठिंबा दिला आहे. बांगला देशातील काही इस्लामिक गट गेल्या अनेक वर्षांपासून या कल्पनेचा प्रचार करत आहेत. सरकारने सार्वजनिकरित्या मात्र त्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. हा मुद्दा आणखी गंभीर आहे. कारण या वेळी ही कल्पना सरकारच्या नेतृत्वाखालील भेट म्हणून उदयास आली आहे. नकाशा नवीन नाही; परंतु विचारसरणी बदलली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ढाका विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात हाच नकाशा प्रदर्शित करण्यात आला होता. त्या वेळी तो विद्यार्थी, इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. नंतर ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय संसदेत हा मुद्दा औपचारिकपणे उपस्थित करण्यात आला.
काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पाऊल म्हणून त्याचे वर्णन केले. त्या वेळी, बांगला देशाने हा मुद्दा ‘अतिशयोक्ती आणि खोडसाळ अर्थ लावणे’ म्हणून फेटाळून लावला; पण आता तोच नकाशा पुन्हा समोर आला आहे आणि तोही आंतरराष्ट्रीय राजनैतिक मंचावर भेट म्हणून दिला आहे. युनूस यांनी ज्या पद्धतीने तो पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याला केला, तो निव्वळ योगायोग वाटत नाही. युनूस यांनी हे पुस्तक इतर नेत्यांनाही भेट दिले आहे. हे पुस्तक आतापर्यंत बाराहून अधिक आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेट देण्यात आले आहे. त्यात अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनाही ते भेट देण्यात आले आहे. यावरून प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हे खरोखर फक्त एक फोटो संकलन आहे का, की बांगला देशची अंतरिम सत्ता रचना. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन वैचारिक संदेश स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे?
‘सल्तनत-ए-बांगला’ हे नाव बंगाल सल्तनत या पूर्णपणे स्वतंत्र मुस्लिम शासित राज्यावरून आले आहे. १३५२ ते १५३८ दरम्यान, या सल्तनतने पूर्व भारत आणि बांगला देशचा एक मोठा भाग व्यापला होता. त्याच्या नावावरून ‘सल्तनत-ए-बांगला’ ही संघटना उदयास आली. ती ‘ग्रेटर बांगला देश’ची मागणी करत आहे. यापूर्वी, जेव्हा या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता, तेव्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत स्पष्टपणे सांगितले होते, की या संघटनेला तुर्कीतील तुर्की युवा महासंघाकडून पाठिंबा मिळतो. बांगला देश सरकारने म्हटले आहे, की ‘सल्तनत-ए-बांगला’ ही मान्यताप्राप्त राजकीय संघटना नाही; परंतु धार्मिक नेटवर्कद्वारे तिची विचारसरणी पसरत आहे.
बांगला देशमध्ये ‘मुस्लिम ब्रदरहूड’चा वाढता प्रभावदेखील चर्चेचा विषय आहे. जेव्हा सौदी अरेबियाने धार्मिक संस्थांना आर्थिक मदत मर्यादित केली, तेव्हा तुर्की आणि कतारने ही पोकळी भरून काढली. त्याच काळात, बांगला देशच्या सामाजिक रचनेत इस्लामिक राजकीय विचारसरणी खोलवर रूजू लागली. युनूस यांनी पाकिस्तानच्या ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना ‘आर्ट ऑफ ट्रायम्फ’ सादर केले. या कलाकृतीची भेट केवळ राजनैतिक सौजन्य नाही. ही कलाकृती वादग्रस्त नकाशा दर्शवते, ज्यामुळे भारतात धोरणात्मक चिंता निर्माण झाल्या आहेत. ही कलाकृती भारताच्या प्रादेशिक अखंडतेला कमकुवत करण्याचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे दिसून येते. या कृतीकडे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला नष्ट करण्यासाठी आणि १९७१ च्या फाळणीतील जुन्या जखमा पुन्हा उघड करण्यासाठी मानसिक युद्धाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. ही कृती पाकिस्तानच्या १९७१ च्या लष्करी पराभवाचे प्रतीकात्मकपणे पुसून टाकण्याचा आणि बांगला देश आणि पाकिस्तानमधील नवीन वैचारिक युती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. सीमेवर वाढत्या बेकायदेशीर कारवाया पाहता ही घटना संभाव्य समन्वयाबद्दल शंका निर्माण करते. ही घटना त्रिपुरा आणि मिझोराम सीमेवर बेकायदेशीर घुसखोरीत वाढ झाल्याच्या वृत्ताशी जुळते. सुरक्षा संस्था या घुसखोरीचा संबंध बांगला देशी नेटवर्कद्वारे कार्यरत असलेल्या पाकिस्तान समर्थित इस्लामिक ‘एनजीओ’शी जोडत आहेत. हे संस्कृती आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून एक समन्वित ‘सॉफ्ट-पॉवर’ आक्रमण आहे. थेट दहशतवादी ‘प्रॉक्सी’ऐवजी राजनैतिक प्रतिकांचा वापर करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: भागा वरखडे












































