पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : शहरी व ग्रामीण भागात दरी न राहता दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, त्यांना दिपोत्सव उत्साहात साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या काळदरी खोऱ्यामधील कोंडकेवाडी या दुर्गम गावातील ६५ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, एक महिन्याचा किराणा व नवीन कपडयांची दिवाळी भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे कोंडकेवाडीतील लोकांच्या चेहर्यावर समाधान झळकलेले पहायला मिळाले.
सामाजिक भावनेतून दुर्गम प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पूरंदर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कोंडकेवाडी येथे दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून त्यांना नवीन कपडयासह भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमात कोंडकेवाडीतील ६५ कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी एकमहिना पुरेल एवढ्या किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गावातील ९३ महिलांना साड्या, ८० मुलामुलींना, तसेच २८ ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडेही देण्यात आले. यावेळी गावातील आबाल वृद्धांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर